Monday, December 28, 2009

एक मुलाकात्....संदीप कुलकर्णी बरोबर


नोव्हेंबर महिन्यातील एक शुक्रवार, स्थळ- ग्रँड सिनेप्लेक्स दुबई. दुबईत प्रथमच एका मराठी चित्रपटाचा प्रिमियर शो होत होता. 'गैर' हे त्या चित्रपटाचे नाव. दुबईतल्या एका प्रतिष्टीत मल्टीप्लेक्स मधे हिंदी आणि इंग्लिश चित्रपटाच्या बरोबरीने एक मराठी चित्रपट दिमाखाने झळकत होता. हजारोंच्या संख्येने उपस्थित राहीलेल्या मराठी माणसाचे उर अभिमानाने भरुन येत होते आणि कारण हि तसेच होते कि. ३ हॉल्समधे एकाच वेळी ह्या चित्रपटाचे स्क्रीनींग होत होते.
एकुण वातावरण प्रचंड उत्साही होते आणि त्याला एका उत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले होते. आणि ह्या प्रसंगाला चार चांद लावले ते सिनेमातील प्रमुख कलाकार आणि दिग्दर्शक ह्यांच्या उपस्थितीने. दिग्दर्शक सतिश राजवाडे, आणि प्रमुख कलाकार संदीप कुलकर्णी, अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडीत हे स्वतः ह्या शो साठी जातीने उपस्थित होते. मराठी चित्रपटाला देखिल इतके ग्लॅमर असु शकते हे 'गैर' ह्या चित्रपटाने दाखवुन दिले.

संदीप कुलकर्णी एक कलाकार म्हणुन मला नेहमीच आवडतात. ते एक गुणी, अभ्यासु आणि हुषार कलाकार आहेत, ज्या कन्व्हिक्शन नी ते काम करतात ते खरंच मानण्याजोगं आहे. अगदी अवंतिकेपासुन ते डोंबिवली फास्ट, श्वास आणि इतर अनेक चित्रपटातून त्यांचा अभिनय आपण बघितलेला आहे. त्यांनी अनेक जॉनरच्या आणि वैविध्यपुर्ण भुमिका आत्तापर्यन्त केल्या. प्रत्येक भुमिकेला ते योग्य तो न्याय देतात.

गैर मधिल त्यांची भुमिका इतकी वेगळी आहे, एकदम ग्लॅमरस आणि स्टाईलीश रोल आहे, पण आपल्या समर्थ अभिनयाने त्यांनी ती भुमिका अगदी बखुबी निभावली आहे. खरंतर रुढार्थाने एका हिरोला लागणारे लुक्स किंवा चेहेरा संदीप कुलकर्णीकडे नाही, पण शेवटी समर्थ अभिनयापुढे ह्या सर्व गोष्टी फोल आहेत हेच खरं. केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी 'गैर' चित्रपटातील एका ग्लॅमरस हिरोची भुमिका अगदी ताकदईने पेलली.

चित्रपट संपल्यानंतर सर्व कलाकार बाहेर उभे होते. मी प्रत्येकाशी एक-दोन वाक्ये बोलली. तेव्हाच मनात आले अरे जर संदीप कुलकर्णींचा इंटरव्ह्यु घेता आला तर? माझ्या मनातील विचार मी लगेच संदीपना बोलुन दाखविला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता लगेच होकार दिला.

दुसर्‍या दिवशी मी सकाळी त्यांना भेटायला पतीसह गेले. हॉटेलच्या लॉबीत ते आले. त्यांचा ब्रेकफास्ट झालेला नव्हता त्यामुळे आपण ब्रेकफास्ट रुममधेच बसायचे का असे त्यांनी मला विचारले. मी अर्थात 'हो' म्हणाले. मग ब्रेकफास्ट करता करता आम्ही अगदी इन्फॉर्मल गप्पा मारल्या. मला खरेतर थोडी मनातुन धाकधुक वाटत होती पण संदीपशी बोलल्यानंतर ती भीती कुठल्याकुठे पळाली. कारण मला त्यांच्यात कुठलीही आढ्यता, गर्व असल्या गोष्टींचा लवलेशही नाही सापडला. हि वॉज सो डाउन टु अर्थ अँड सिंपल.

मी त्यांच्याशी ज्या गप्पा मारल्या त्याच आपल्या समोर मांडत आहे. त्यांनी बोलतांना जे जे इंग्रजी शब्द वापरले ते तसेच ठेवले आहेत. त्यांची वाक्ये जशीच्या तशी आपल्या समोर मांडत आहे. त्यामुळे जर खुप जास्त इंग्रजी शब्दांमुळे रसभंग होत असेल तर क्षमस्व.





तुम्ही मुळचे कुठले आणि अभिनय क्षेत्रात कसा प्रवेश झाला?

मी मुळचा मुंबईचाच. माझी आई पुण्याची आहे, जन्म पुण्याचा पण माझे सर्व शिक्षण हे मुंबईतच झाले. माझी कर्मभुमी हि मुंबईच आहे.
मी अ‍ॅक्चुअली जे.जे. स्कुल ऑफ आर्टस चा विद्द्यार्थी आहे. कॉलेजातून मी नाटकात वैगरे कामं करायचो. इंटर कॉलेज एकांकिका-नाटकांमधुन मी कामं केली. त्यात बक्षिसेही मिळाली. त्याच वेळेला सई परांजपेंची छोटे-बडे हि दूरदर्शन मालिका चालु होती त्यात मी गंमत म्हणुन काम केले. कारण ती मालिका आर्ट कॉलेजवरच होती. तिथुनच अ‍ॅक्टींगची आणि ह्या क्षेत्राची आवड निर्माण झाली.
मग मी एन्.एस्.डी (नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा) जॉईन करायचा विचार केला. माझी एन्.एस्.डी ची अ‍ॅडमिशन प्रोसिजर चालु असतांनाच माझी ओळख सत्यदेव दुबेजींशी झाली. दुबेजी स्वतःच एक इंस्टीट्युट आहेत. त्यांच्याबरोबर काम करणं हे कुठल्याही अ‍ॅक्टींग स्कुलमधे शिक्षण घेण्यासारखच आहे किंबुहना दुबेजींबरोबर जास्त शिकायला मिळतं कारण त्यांचे प्रत्येकाकडे वैयक्तीक लक्ष असतं. त्यामुळे मी ३ वर्षे दुबेजींबरोबर काम केले. वेगवेगळ्या भाषांमधे थिएटर केले. म्हणजे हिंदी, इंग्लिश, मराठी आणि इतर काही भाषा. तेंडुलकर, एलकुंचवारांपासुन ते अतिशय यंग अशा लेखकांच्या नाटकात कामे केली. तीथे ३ वर्षात मला खुप काही शिकायला मिळाले. त्यामुळे मला आजही वाटत माझे एन्.एस्.डी मधे अ‍ॅडमिशन न घेता दुबेजींबरोबर ३-४ वर्षे काम करण्याचे डिसिजन योग्यच होते. आणि हे माझे फांउडेशन होते. ह्या काळात इतके वाचन आणि रिगरसली काम केले कि माझे एक अँक्टींग क्षेत्रात स्ट्राँग फांउडेशन तयार झाले आणि त्याचा मला आत्ता खुप फायदा होतो आहे.

तुम्ही खरे घराघरांत जे पोहोचला ते अवंतिका ह्या मालीकेमुळे. ह्या मालिकेविषयी काही आठवणी सांगाल का?
तसं बघायला गेलं तर मला टेलिव्हिजन कधिच फारसं एक्साईट करायचे नाही. मी व्हिज्युअल आर्टस चा विद्द्यार्थी असल्याने मला सिनेमा जास्त आवडतो. मी कॉलेजमधे असल्यापासुन वर्ल्ड सिनेमा पाहीला होता. त्यामुळे सिनेमा किती पॉवर्फुल असतो ते मला माहीत आहे. टेलिव्हिजन हे जस्ट एक वेहिकल म्हणुन मी बघतो. जेव्हा हातात सिनेमाचे काम कमी असेल तेव्हा मग मी टेलिव्हिजन वरच्या मालीका स्वकारतो. आणि श्वास नसता झाला तर मी मराठी सिनेमात कधीच दिसलो नसतो. कारण त्या आधिचा मराठी सिनेमामधे म्हणजे जास्त करुन कॉमेडी आणि त्या प्रकारच्या सिनेमात मी स्वतःला कुठे प्लेस करु शकलो नसतो.
मी श्वासच्या आधी बर्‍याच हिंदी सिनेमातुन कामे केली. जसे मम्मो, शूल, हजार चौरासीकी माँ. इस रात कि सुबह नही. चांगल्या दिग्दर्शकांबरोबर मी कामे केली. कारण हे सगळे लोकं पृथ्वी थिएटरला नाटक बघायला येयची ज्यात मी काम करायचो. तिथुनच त्यांनी मला स्पॉट केले आणि त्यांच्या सिनेमात काम करण्याची ऑफर दिली. त्याचवेळी टेलिव्हजन पण पॉप्युलर होत होतं, डेली सोपची कन्सेप्ट आपल्याकडे रुजु लागली होती. मग मी बर्‍याच हिंदी मालिकांमधुन कामं केली. जसे ९ मलबार हिल, स्वाभिमान वैगरे. सहारा वर क्षितिज अशा अनेक हिंदी मालीकांमधुन मी कामे केली. पण नंतर ह्या डेली सोप्सचा पण कंटाळा येउ लागला कारण तेच तेच काम किती दिवस करणार?
पण त्याच दरम्यान मराठी चॅनेल्स सुरु झाले. अल्फा मराठी आले आणि अवंतिका देखिल त्याच दरम्यान आली. अवंतिका करतांना मला वाटले नव्हते कि ती इतकी पॉप्युलर होईल. पण अवंतिकेच्या बाबतीत एक म्हणता येईल कि त्याची सगळी टिमच उत्कृष्ट होती. जसे दिग्दर्शक संजय सुरकर, स्मिता तळवलकरचे प्रॉडक्शन आणि प्रत्येक पात्र जसे मॄणाल देव, सुबोध, श्रेयस, दिपा लागु आणि इतर सर्वच कलाकार हे त्या त्या भुमिकेमधे इतके चपखल बसले. असं म्हणतात कि कास्टींग बरोबर केले कि मोअर दॅन हाफ जॉब इज डन. शिवाय त्याचे लिखाण, दिग्दर्शन सर्वच चांगले असल्याने ती एव्हडी लोकप्रिय झाली असावी. ती मालीका शेवटी इतकी पॉप्युलर झाली कि ती बंगाली, गुजराथी आणि इतर अनेक भाषांत डब झाली.
त्यामुळे माझ्या आयुष्यातील तो एक महत्वाचा माईलस्टोन ठरला.

आणि ते होताहोताच श्वास झाला. आम्हाला कुणालाच वाटलं नव्हतं कि श्वास इतका मोठा होईल पण श्वासच्या बाबतीत सुद्धा कुठेतरी ती कथा ऐकतांना किंवा एकुणच त्याची निर्मिती चालु असतांना कुठेतरी मला एक गट फिलींग येत होतं कि हा वेगळा आणि छान सिनेमा होणार आहे. श्याम बेनेगल वैगरें सारख्या दिग्गजांबरोबर कामं मी केलं होतं, वर्ल्ड सिनेमा पाहीला होता त्यामुळे त्याची निर्मितीची प्रोसेस जेव्हा सुरु झाली तेव्हा कुठेतरी माहीत होतं कि हा सिनेमा वेगळा आणि चांगला होणार आहे. कुठलीही भुमिका स्विकारण्याच्या आधी मी त्याचे स्क्रीप्ट वाचतो. स्क्रिनप्ले आणि स्क्रिप्ट आवडले तरच मी भुमिका स्विकारतो. श्वासच्या बाबतीत तेच घडलं संदिप सावंतचे
फोकस आणि व्हिजन खुप चांगले होते. इन्फॅक्ट त्याच्या व्हिजन मुळेच श्वास इतक्या उंचीवर गेला.
श्वासमुळे मराठी चित्रपटाला एक वेगळी दिशा मिळाली. त्यानंतर बरेच चांगले मराठी चित्रपट येयला लागले पण दॅट क्रेडीट गोज टु श्वास. परत मराठी मधे चांगले चित्रपट येयला लागले. श्वास वॉज द टर्निंग पॉईंट. आफ्टर दॅट एव्हरीबडी कुड डेअर टु मेक सच फिल्मस.

तुम्ही श्याम बेनेगल, गोविंद निहलानी सारख्या दिग्गज दिग्दर्शकांबरोबर काम केलत, तर तुमचे त्यांच्याबरोबर काम करतांनाचे काही अनुभव आमच्या बरोबर शेअर कराल? प्रत्येकाची काही खासियत सांगु शकाल?

खरं सांगु का, हे माझे वैयक्तीक मत असेल, अनुभव असेल.. ह्या मोठ्या दिग्दर्शकांबरोबर काम करतांना खुप शिकायला मिळाले, एकतर त्यांचा अनुभव इतका मोठा असतो, पण त्यांबरोबर काम करतांना एक दडपण देखिल असते. आपण जास्त सजेशन्स वैगरे देउ शकत नाही. व्हेअर अ‍ॅज ह्या आताच्या यंग दिग्दर्शकांबरोबर काम करतांना जास्त मजा येते. एकतर त्यांच्यात जी नविन काहीतरी करण्याची जिद्द, एनर्जी असते, शिवाय पहिले प्रोजेक्ट असेल तर खुप सारा उत्साह आणि डेडिकेशन, नविन आयडीयाज, नविन एक्सपरिमेंट करण्याची तयारी ह्या सार्‍या गोष्टी असतात ज्या एका नविन निर्मितीसाठी, प्रोजेक्टसाठी खुप आवश्यक असतात. दॅट मेक्स द फिल्म. खुप सिनियर दिग्दर्शक असेल तर तो म्हणेल तसेच करायला लागते. यु कॅनॉट इव्हन गिव्ह काउंटर ओपीनियन. दॅट इज माय एक्स्पिरियन्स. उदा. संदिप सावंत, मधुर भांडारकर, सतिश राजवाडे, निशिकांत कामत वैगरे.
कुठल्याही चित्रपटामधे प्रि वर्क इज व्हेरी इम्पॉरटंट. कारण वन्स इट इज प्रिंटेड यु कॅनॉट डु एनीथींग अबाउट इट. एखादी भुमिका स्विकारल्यानंतर डायरेक्टर तुम्हाला त्या पात्राचा गेट-अप काय असेल, त्याचा स्वभाव काय आहे, किंवा त्या कॅरॅक्टरची रुपरेषा समजवून सांगतात. सगळे चांगले डयरेक्टर्सचे प्रि वर्क परफेक्ट झालेले असते. आणि तरच फिल्म चांगली बनते.



तुम्ही भुमिका साकारण्याच्या आधि त्या कॅरॅक्टरचा काही विशेष अभ्यास करता?

ह्या मधे बर्‍याच गोष्टी असतात. मी व्हिज्युअल आर्ट्सचा विद्यार्थी असल्याने माझी व्हिज्युअल मेमरी खुप चांगली आहे. मी जेव्हा एखाद्या व्यक्तीला भेटतो, तीच्याशी बोलतो तेव्हा तीचे एक व्हिज्युअल इम्प्रेशन माझ्या मनावर तयार होते. आणि त्याचा उपयोग मला एखादी भुमिका साकरतांना खुप होतो.
जसे मी श्वास करतांना पुणताबेकरांना भेटलो. कारण त्यांचीच ती केस होती. त्यांच्या बरोबर फक्त ३ मिटींग्ज केल्या, एकदा त्यांना त्यांच्या कंसल्टींग रुममधे भेटलो, एकदा त्यांच्याबरोबर ऑपरेशन थिएटरमधे गेलो होतो. त्यांना बघुन एक कळलं कि अत्यंत बिझी असुनही कॉलीटेटीव्ह वर्क कसं करतात ते. ह्या ३ मिटींग्जमधे मला ते कॅरॅक्टर मिळालं. म्हणजे कॅरॅक्टरचे इतके डिटेलींग स्क्रीप्टमधे नसते. इथे अ‍ॅक्टरची स्वतःची आकलनशक्ती आणि त्याचे अ‍ॅक्टींग स्कील कामाला येते. त्याला जितके ते कॅरॅक्टर जास्त समजते तितका तो रोल जास्त उठावदार होतो.
जसं डोंबीवली फास्ट मधिल माधव आपटे हे पात्र, ह्याच्याशी रिलेट करणं खुप सोपं गेलं, कारण मी मुंबईत वाढल्याने, लोकल ट्रेन्सचा प्रवास हे काय दिव्य असतं ते अनुभवलेलं आहे. त्यामुळे त्यातिल कॅरॅक्टरशी रिलेट करणं खुपच सोप गेल.

डोंबिवली फास्ट हा चित्रपट खुप गाजला. त्याविषयी काही अनुभव सांगु शकाल, म्हणजे चित्रिकरणा दरम्यान आलेले किंवा चित्रपटाला एव्हडे सक्सेस मिळाले तेव्हा त्याविषयी काही....

श्वासनंतर डोंबिवली फास्ट वॉज अ डेलिबरेट अटेंप्ट. म्हणजे आम्हाला कुठेतरी हे सिद्ध करायचं होतं की श्वासनंतर मराठी चित्रपटाला पुन्हा एक नवी आणि योग्य दिशा मिळाली आहे. आणि आता असे चित्रपट अजुन मराठीत येयला पाहिजेत. त्यामुळे डोंबिवली फास्टचे स्क्रिप्ट घेउन आम्ही जवळ जवळ एक-दिड वर्ष वेगवेगळ्या प्रोड्युसर्सकडे फिरत होतो. आमचे ते ड्रिम प्रोजेक्ट होते. आणि जेव्हा आम्हाला योग्य प्रोड्युसर मिळाला तेव्हा आमचे व्हिजन आणि गोल ठरलेले होते. आम्हाला तो आंतरराष्ट्रीय पातळीवर कसा जाईल आणि त्याची इंटर नॅशनल सिनेमाला योग्य अशी कॉलीटी असली पाहीजे हे आमचे अगदी ठरलेले होते. शेवटी व्हॉट इज इंटर नॅशनल सिनेमा? लॅग्वेज इज नॉट द बॅरियर फॉर सिनेमा. म्हणुनच इरानियन मुव्हिज आज किती पॉप्युलर आहेत. शेवटी इंटरनॅशनल मुव्हीज म्हणजे तुमचे जग त्यांच्या पर्यन्त पोहोचवणे. आणि खरेखुरे जग. हे सर्व डोंबिवली फास्टच्या बाबतीत घडत गेलं
आणि त्या प्रोसेसमधे खुप वेगवेगळे अनुभव आले. गर्दीचे शुटींग करणे, गर्दी असलेल्या लोकल मधे चढणे आणि कॅमेरा घेवून त्याची शुटींग करणे आणि ते सुद्धा लोकांचे लक्ष न जाउ देता, हि अतिशय अवघड टास्क आमच्या समोर होती. म्हणजे योग्य ते शॉट्स मिळवणं हि अतिशय अवघड कामगिरी होती. आम्ही दिवस-रात्र शुटींग करत होतो. ह्या चित्रपटात एक असा प्रसंग आहे कि माधव आपटे एका संध्याकाळी जे घराबाहेर पडतो ते डायरेक्ट ३ दिवस तो सतत घराबाहेर रहातो. त्या ३ दिवसांचे आम्ही देखिल सलग चित्रिकरण केले. मेहनत बरिच घेतली. पण चित्रपट करतांनाच आम्हाला हे कुठेतरी ठाउक होते कि हा सिनेमा चांगला आणि आमच्या एक्स्पेक्टेशन प्रमाणे होणार आहे, तसं आम्हाला श्वासच्या वेळेला माहीत नव्हते कि श्वास हा इतक्या उंचीला पोहोचणार आहे.
आणि आमच्या अपेक्षेप्रमाणेच डोंबिवली फास्ट हा एक आंतराष्र्टीय पातळीवरचा सिनेमा बनला. त्याला बरीच रिजनल, नॅशनल आणि इंटर्नॅशनल अशी बेस्ट फिल्मची पारितोषिके मिळाली. त्यावर्षी त्याला लॉस एंजलीस फिल्म फेस्टीव्हलला बेस्ट फिल्मचे पारितोषिक मिळालं आणि त्याचवेळी इतर अनेक चित्रपट काँपिटिशनमधे होते जसे परिणीता आणि इतर अनेक हिंदी चित्रपट काँपिटीशन मधे होते. सिंगापुर फिल्म फेस्टीव्हलला सुद्धा ह्या सिनेमाला बेस्ट फिल्मचे अवॉर्ड मिळाले.

तुम्ही आत्तापर्यंत जे रोल्स केले त्यातिल तुमचा सर्वात आवडता रोल कोणता?
कसं आहे माहीत आहे का कि एखादा प्रोजेक्ट पुर्ण झाला कि एक डिटॅचमेंटची गरज असते. म्हणजे त्यानंतर त्या रोलमधिल इन्व्हॉलमेंट संपायला पाहीजे त्याच्याशिवाय मग तुम्ही पुढे दुसरे अजुन एक्सायटींग रोल कशे करु शकणार? जर तुम्ही पहील्या रोल मधुनच बाहेर पडला नसाल तर? आता डोंबिवली फास्ट झाल्यानंतर मला लोकं विचारायला लागले कि पुढे काय? आता ह्या ताकदीचा रोल केल्यानंतर पुढे अजुन काय वेगळं करायला उरलं आहे? म्हणजे एका अ‍ॅक्टरला पहिल्या फ्रेमपासुन शेवटच्या फ्रेमपर्यंत असा रोल मिळणं आणि ते सुद्धा इतके पॉवरफुल शॉट्स मिळणं हे प्रत्येक अ‍ॅक्टरचे ड्रिम असते, आणि ते माझ्या बाबतीत घडल होतं. त्यामुळे शेवटी मलाच मला कन्व्हिन्स करायला लागलं कि नाही धिस इज नॉट द एन्ड, मला अजुनही बरंच काही करण्यासारखं आहे. आणि त्यामुळेच आम्ही 'गैर' हा अत्यंत वेगळ्या धाटणीचा, जॉनरचा पिक्चर बनवायचं ठरविलं. डोंबिवली फास्टनंतर हा सिनेमा पुन्हा एक असाच ड्रीम प्रोजेक्ट होता. आणि शेवटी अ‍ॅक्टर कॅन ओनली विश, पण शेवटी इट इज अ डायरेक्टर्स व्हिजन अ‍ॅन्ड इट इज हिज बेबी.

तुमचा ड्रीम रोल कुठला आहे? म्हणजे कुठली भुमीका तुम्हाला करायला आवडेल? किंवा एखादा कुठला रोल जो तुम्हाला मिळाला नाही पण तो तुम्हाला करायला आवडला असता?
(ह्या प्रश्णाचे उत्तर देणे त्यांनी शिताफिने टाळले.)



आय रिअली डोंट बिलीव्ह इन द ड्रीम रोल्स. मला वेगवेगळ्या जॉनरचे पिक्चर करायला आवडतात. आणि हिंदी-मराठीत असा कुठलाही रोल मला नाही सांगता येत जो मला मिळाला नाही पण मला करायला आवडला असता. हो येस, हॉलीवुडमधिल असे बरेचसे रोल्स मी सांगु शकतो जे मला करायला आवडतील, आवडले असते. मी मराठीत तसे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे रोल्स केले आहेत जे एकमेकांपासुन बरेच वेगळे होते. जसे साने गुरुजींचा रोल मी केला, तसं माझ्याकडे पाहुन कुणालाही वाटलं नसतं कि मी त्या रोल साठी योग्य आहे, पण डायरेक्टरला तसा विश्वास वाटला आणि मग मी देखिल साने गुरुजींसारखे दिसण्यासाठी बरंच वजन कमी केलं, टॅन झालो कारण ते खानदेशचे असल्याने सावळे होते आणि इतरही मेहनत घेतली.

म्हणजे एखादा रोल करण्यसाठी बरीच मेहनत घ्यावी लागते तर?
हो हो म्हणजे काय? कारण एकदा सिनेमा प्रींट झाला कि तुम्ही काहीच करु शकत नाही आणि सिनेमा हा काही सिरियल्स सारखा नसतो कि एपिसोड एकदा टेलिकास्ट झाला कि तुम्ही विसरुन देखिल जाता. पण सिनेमाचे तसे नसते. तुम्ही जे काम कराल त्याचा रेकॉर्ड रहातो. त्यामुळे जेव्हा एखादा रोल तुम्ही साकारता तेव्हा त्याचा पुर्ण अभ्यास आणि त्याच्यावर मेहेनत हि घ्यावीच लागते.

तुमचे आवडते अ‍ॅक्टर्स कोणते?

बरेच आहेत. ज्यांचे अ‍ॅक्टींग बघुन मला खुप मिळालं आहे आणि ज्यांना बघुन मी खुप शिकलो आहे असे बरेच अ‍ॅक्तर्स आहेत. जसे नसिरुद्दीन शहा, नीळु फुले, अमिताभ बच्चन, वेस्ट मधिल बरेच अ‍ॅक्टर्स आहेत जसे डस्टीन हॉफमन, अल पचिनो, रॉबर्ट डिनेरो असे बरेच अ‍ॅक्टर्स आहेत.

'गैर' हा चित्रपट हा एक अत्यंत वेगळ्या जॉनरचा पिक्चर आहे, मराठीत पहिल्यांदीच इतका ग्लॅमरस आणि स्टाईलीश पिक्चर बनविला आहे. तर त्यात काम करतांना कसं वाटलं? काही अनुभव सांगाल?
जसं मी पहिले पण सांगितले कि मला वेगवेगळ्या जॉनरचे पिक्चर करायला आवडतात. आत्तापर्यन्त जो रोल केला नाही तो करायला आवातो. गैर मधे पुन्हा एक असाच सरप्राइज देणारा फॅक्टर होता. म्हणुन मी तो रोल स्विकारला. बरं त्यात मला डान्स वैगरे पण करायचा होता. मी काही एक चांगला डान्सर नाही. आय अ‍ॅम बेसिकली अ ट्रेन्ड अ‍ॅक्टर. त्यामुळे डान्स करायचा आणि तो देखिल प्रेक्षकांना कन्व्हिन्सिंग वाटेल असा करायचा हे माझ्यासाठी अवघड होते. शिवाय अमृता हि तर स्वतः डान्स शिकलेली असल्याने मला अजुन टेन्शन होते तीच्याबरोबर डन्स करतांना. त्यामुळे मला डान्सच्या आधी बर्‍याच रिहल्सल्स कराव्या लागल्या.

मराठीत आता कुठल्या प्रकारचे चित्रपट येयला हवे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे 'श्वास', 'डोंबिवली फास्ट' सारखे कि 'गैर' सारखे ग्लॅमरस, नविन पीढीला आकर्षित करणारे?

नाही असं काही नसतं. सिनेमाला तसं म्हंटल तर टाईप असा काही ठरलेला नसतो. व्हॉट यु मेक बिकम्स द टाईप. सगळ्या प्रकारचे चित्रपट बनायला हवे. वेस्टमधे ते वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट बनवत गेले म्हणुनच तो वाढत गेला. आपल्याकडे म्हणजे एकदा एका प्रकारचा चित्रपट आला कि लगेच तसे १० चित्रपट येतात. वेस्टमधे तसे नसते. ते लगेच अजुन वेगळ्या टाईपचा चित्रपट कुठला बनविता येईल ते बघतात.
पण सध्या मराठीत सुद्धा वेगवेगळ्या विषयावरचे खुप चांगले चांगले चित्रपट येत आहेत. उदा. गाभ्रीचा पाउस, हरिश्चंद्रची फॅक्टरी आणि इतर अनेक. आत्ता मराठी चित्रपटात जितके वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत तितके माझ्यामते सध्या कुठल्याच इन्डियन फिल्म्स मधे हाताळले जात नाही आहेत.
अर्थात चित्रपटाचे सिक्वेल्स बनविण्यात काही गैर नाही. पण ती एक चॅलेंजींग टास्क असते. कारण त्याचा सिक्वेल हा त्यापेक्षा अधिक चांगला बनला गेला पाहीजे. जसं गैरचा सिक्वेल बनणं शक्य आहे. त्याच्या स्टोरीमधे एक ओपन एन्ड आहे.

मराठीत इतके टॅलेंटेड अ‍ॅक्टर्स आणि डायरेक्टर्स आहेत तरीही मराठी चित्रपट हा महाराष्ट्रात इतका चालत नाही जेव्हडा हिंदी चालतो किंवा इतर राज्यांमधे जितका त्यांचा रिजनल पिक्चर चालतो. तर असे का ?

ह्याला बरीच कारणे आहेत, एकतर महराष्ट्रात मराठी बरोबरच हिंदी हि भाषा बहुतांशी बर्‍याच लोकांना समजते आणि त्यामुळे मराठीचा जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांना हिंदी सिनेमाचे पण ऑप्शन ओपन असल्याने ते हिंदी चित्रपट अधिक बघतात. शिवाय बाकीच्या राज्यांमधे त्यांचा ऑडियन्स हा कमिटेड आहे त्यांच्या चित्रपटांसाठी. म्हणजे साउथ मधे जसा अंधविश्वास असतो तिथल्या स्टार्सबद्दल, म्हणजे ते त्यांची मंदीरं बांधतात, अगदी तितका अंधविश्वास जरी नाही ठेवला तर एक आपला चित्रपट पुढे आणण्यासाठी मराठी प्रेक्षकांनी कमिटमेंट दाखविली पाहीजे. म्हणजे मी तर म्हणेन आता इतका चांगला मराठी सिनेमा बनत आहे तर प्रेक्षकांनी सुद्धा त्याला साथ दिली पाहीजे. म्हणजे महिन्यातुन एक तरी मी मराठी चित्रपट थिएटरमधे जाउन बघिन असं ठरविलं पाहीजे. त्या शिवाय मराठी चित्रपट पुढे जाणार नाही.
आणि मराठीतली जी तरुण पीढी आहे त्यांना आकर्षित करेल असा मराठी सिनेमा बनला पाहीजे. गैर हा त्याचदॄष्टीने एक प्रयत्न आहे. आणि मी सुद्धा प्रयत्न करणार आहे कि नविन पीढीला आवडेल असा मराठी चित्रपट बनविला पाहीजे.

तुमचे आगामी प्रोजेक्टस काय आहेत?

माझा आगामी चित्रपट आहे 'अंकगणित आनंदाचे' . हा एक गंभिर विषयावरील चित्रपट आहे. रिसेशनचा बॅकड्रॉप ह्या कथेला आहे. म्हणजे रिसेशनमुळे नायकाचा जॉब जातो आणि त्यामुळे त्याची बायको देखिल त्याला सोडुन जाते. आणि मग नायक आणि त्याचा ४ वर्षांचा मुलगा कसे त्या परिस्थितीशी लढतात ते ह्या चित्रपटात दाखविले आहे.
हिंदीमधे आगामी चित्रपट आहे 'वेटींग रुम' हि एक १ नाईट मर्डर मिस्ट्री आहे. ज्यात ४ प्रमुख पात्रे आहेत. हे एक सायकॉलॉजीकल थ्रिलर आहे. आणि हि फिल्म तयार आहे.

खरंतर गप्पा मारता मारता त्यांचा ब्रेक्फास्ट तसाच अर्धवट राहीला होता, बोलण्यामधे ते इतके मश्गुल झाले होते. अजुन विचारण्यासारखं बरंच होतं पण वेळेच बंधन देखिल होते त्यांना शॉपिंग करायला , दुबई भटकायला देखिल जायचे होते. त्यामुळे मी मग मुलाखत आवरती घेतली.
त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर माझा त्यांच्याविषयीचा एक कलाकार म्हणुन असलेला आदर अजुन वाढला, आणि एका अतिशय गुणी, हुशार आणि विचारी कलावंताबरोबर आपल्याला गप्पा मारता आल्या ह्याबद्दल आनंद झाला.

Friday, January 16, 2009

वोह कागज कि कश्ती वोह बारिश का पानी

आई मला PSP हवाय, माझ्या सगळ्या friends कडे आहे तो. only I dont have it". ' इति माझा ६ वर्षाचा मुलगा.
'अरे पण काही महिन्यांपुर्विच आपण तूला gameboy घेतला ना, तो खेळ ना " इति मी
'अग आई gameboy आता outdated झाला, मला PSP च हवा. त्यावर वेगळे games आहेत.' इति माझा ६ वर्षीय मुलगा.
इथे दुबईमधे शुक्रवार शनिवार हे जे सुट्टीचे वार असतात, तेव्हाच काय ते मुलांना एखाद्या club ची वैगरे मेम्बरशीप घेउन badminton, tennis अथवा इतर तत्सम जे socalled साहेबी खेळ आहेत ते खेळायला घेउन जाउ शकतो. एरवी शाळा असतांना बाहेर कुठेही मैदानी खेळ खेळायला मुलांना जाता येत नाही. वेळच नसतो. मग काय दिवसभर सतत cartoons बघणे किंवा computer games, game boy, play station वैगरे वैगरे खेळणे. नाही म्हणायला building मधली मुले येतात घरी खेळायला पण एकत्र जमून ह्यांचे पुन्हा computer games खेळणे चालते. परवा असाच मी माझा मुलगा व त्याचे building मधिल मित्र ह्यांचा एक खेळ बघत होते. हि मुले (सर्व मुले साधरणतः वयोगट ५-७ वर्षे) प्रत्येक जण cartoon मधली एक एक characters आहेत असे समजुन एकमेकांना खोटे खोटे बंदुकिने मारणे असा काहीतरी खेळ खेळत होते. तेव्हा मनात विचार आला आत्ताच्या मुलांचे खेळ, त्यांची करमणुकीची साधनं सगळं किति वेगळं आहे माझ्या बालपणापेक्षा.
माझे मन थेट भूतकाळात गेलं. ६ वर्षाची असतांना आम्ही कुठले खेळ खेळायचो? अर्थात सगळे मैदानी खेळ. आणि घरात बसुन खेळायचे असेल तर पत्ते वैगरे.
Technology चे आत्ताएव्हढे आक्रमण तेव्हा अर्थात झालेले नव्हते. मी ६ वर्षाची असतांना आमच्या नाशिकला साधा टेलिव्हि़जन देखिल आला नव्हता. तेव्हा Personal Computer नावाची गोष्ट तर आस्तित्वातच नव्हती. मग आम्ही काय करायचो? आत्ताच्या मुलांना तर प्रश्नच पडेल कि T.V. नाही, Computer नाही, PSP, gameboy, play station तर फार फार दूरची गोष्ट मग आपले आई-वडिल bore कसे नाही व्हायचे? कारण आत्ताच्या मुलांना इतकी सारी करमणुकीची साधनं उपलब्ध असुनसुद्धा '''I am getting bored' हे वाक्य आपल्याला अनेक वेळा ऐकु येतं. पण वेळ घालविण्याचा आम्हाला कधी problem नाही आला. माझ्या डोळ्यासमोर माझे बालपण आले. आणि अचानक खुप nostalgic वाटायला लागलं.
माझे बालपण गेले एकत्र कुटंबात, मला ३ काका. आजीचा हट्ट होता कि तीच्या चारही मुलांनी तीच्या जवळच राहिले पाहिजे. आणि म्हणुनच माझ्या आजी-आजोबांनी आपल्याच जागेत एक मोठी इमारत बांधली. प्रत्येक काकांचे घर एका मजल्यावर. धाकटे काका मात्र माझ्या आजीच्याच जुन्या घरी रहात. आजीचे बैठे घर होते ब-याच खोल्यांचे. आणि हे घर आणि आमची इमारत हे सगळे एकाच मोठ्या प्लॉट मधे होते. तशी जागा मोठी असल्याने आमच्या घरापुढे मोठ्ठ आवार, आणि आवारात एक विहिर देखिल होती. आजीच्या घरासमोर एक छानशी गच्ची, व तीच्यात एक झोपाळा. संध्याकाळी माझी आजी त्या झोपाळ्यावर हमखास बसायची. मग सर्व काका-काकु आजीला भेटायला संध्याकाळी त्या घरासमोरिल गच्चीत जमायचे, आणि मस्त गप्पा रंगायच्या. आंगणात सायली, जाई, जुई चे वेल, गुलाब, मोगरा अशी फुलांची झाडे होती, आवारात आंब्याची ३ मोठ्ठी झाडे, चिंच, विलायती चिंच, बुच असे मोठे वृक्ष. आंगण अनेक फळा -फुलांच्या झाडांनी भरलेले होतं.
संध्याकाळी आम्ही सर्व सख्खी आणि चुलत भांवंडे (एकुण आम्ही १२ भावंडे होतो), आणि आमचे इतर गल्लीतले मित्र-मैत्रीणी सर्व आमच्या आवारात जमायचो (मोठ्ठ आवार होतं ते), आणि अनेक खेळ खेळायचो. परदेशात रहाणा-या माझ्या मुलाला हे खेळ माहित देखिल नाहीत. लपंडाव, भोकांजा, डब्बा-ऐसपैस, रुमाल्-रुमाल, खांब खांब खांबोळी, आमच्या मुलींचा खेळ म्हणजे ठिक-या. धमाल करायचो आम्ही. शेवटी खेळून खेळून इतके दमलेले असायचो कि घरी जाउन हात्-पाय धुउन, जेवलो कि झोपलो.
मे महिन्यातील सुट्टी आणि दिवाळीतली सुट्टी म्हणजे आनंदाची पर्वणीच होती. प्रत्येकाचे आईकडील कोणी ना कोणी नातेवाईक म्हणजे आ़जी-आजोबा, मामे, मावस भावंड सुट्टीला नाशिकला येयचे. आणि वडिलांकडील नातेवाईक सगळ्यांचे common च होते, आत्या व आते भावंड देखिल येयचे आणि आम्ही सर्व चुलत भावंडं एकाच premises मधे रहात असल्याने, प्रत्येकाच्या आईकडील नातेवाईक हे आमचे देखिल तितकेच जवळचे होते. मग काय सुट्टीत लहान मुलांची संख्या अजुन वाढायची. सगळे मिळुन पत्त्यांचे असंख्य games खेळायचो. लहान वयातील मुले ७-८, ५-३-२, तर आम्ही लॅडीज, ३०४, बिझिक, बदाम सात, गुलाम चोर, चॅलेंज, not at home, judgement आणि असंख्य इतर पत्त्यांचे games खेळायचो. आणि हळुच इतरांचे पत्ते बघणे, खुप बदमाशी करणे वैगरे चालायचे. खरंच किती सुंदर दिवस होते ते. सगळ्या चिंतातून मुक्त जीवन.
दिवाळीत मस्त किल्ला बांधायचो. नर्कचतुर्दशीच्या दिवशी सकाळी सर्वात पहिले फटाका कोण लावणार ह्यांत चढाओढ असायची. माझा मोठा भाऊ सर्वात हुशार, तो रात्री १२ वाजता पहिला फटाका लावुन मग झोपायचा. म्हणजे सर्वात पहिला फटाका मी लावला होता हे म्हणायला मोकळा. दिवाळीच्या शेवटच्या दिवशी सगळ्यांच्या लवंगी माळ आणि इलेक्ट्रीक माळेचा (फटाक्याचा आमच्या लहान पणीचा एक प्रकार) जो उरलेला stock असायचा त्याची एकत्र एक मोठ्ठी माळ गुंफायचो आणि मस्त एक ५-१० मिनिट चालणारी लड वाजायची. काय काय उद्योग करायचो आत्ता आठवून मजा येते.
संक्रांत हा असाच एक अजुन उत्साही सण आमच्या साठी. पतंग आणणे, मग बरवलीचा मांजा आणणे आणि गच्चीवरुन मनसोक्त पतंग उडविणे. आम्ही मुली फक्त आमच्या भावांना cheering करण्यासाठी गच्चीवर जात असु. आणि मांज्याचे रिळ पकडण्यासाठी. पतंगाचे पेच लागायचे. मग समोरच्या rival group चा पतंग कटला की आम्ही जाम ओरडायचो. त्यांना चिड्वायचो. माझा चुलत भाऊ पतंग उडविण्यात expert होता. कटलेला पतंग तो बरोबर आपल्या पतंगाला लटकवुन खाली आणायचा. दुस-याची कटलेली पतंग आपल्या गच्चीत अथवा आंगणात आली कि आनंद गगनात मावेनासा होयचा.
आम्ही तर मांजा पण घरी बनविण्याचा उपद्व्याप केला आहे. साबुदाणा, कोरफड, काचेची बारिक भुकटी आणि अजुन काय काय अनेक विचित्र पदार्थ एकत्र करुन एक लुद्दी बनवायचो आणि ती धाग्याला लावायचो.
संध्याकाळी मग तिळ्गुळ वाटण्याचा समारंभ, अनेक गावातील नातेवाईक, ओळ्खीची लोके तिळ्गुळ वाटायला घरी येयचे. माझ्या आजीच्या घरी सगळा गोतावळा जमायचा. आम्ही लहान असलो तरी नटण्या मुरड्ण्याची भारी हौस. आणि आम्हा मुलींना अगदी चिमुरड्या होतो तरि साडी नेसण्याची जाम हौस. तेव्हा 'कल्पना' साडी नावाची साडी मिळायची लहाम मुलींकरिता.. ती शिवलेली असायची म्हणजे अंगात एखाद्या फ्रॉक सारखी घालता येयची. आम्ही अगदी चिमुरड्या असतांना ती कल्पना साडी घालायचो. आणि तिळ्गुळ देण्यासाठी-घेण्यासाठी प्रत्येकाच्या घरी फिरायचो.

तसेच अजुनही स्मरणात रहाते ती होळीपोर्णिमा. कुठुन कुठुन लाकडे गोळा करुन आणायचो, गव-या आणायचो आणि मस्त होळी पेटवायचो. त्यात मग आम्ही कांदे, बटाटे देखिल घालायचो. त्या कांदे-बटाटयाची चव काय सही लागायची. आजही परदेशात आम्ही बार्बेक्यु केला कि मन थेट त्या आठवणीतल्या होळीपोर्णिमेत जाते आणि ते तिखट मीठ लावून खाल्लेले कांदे, बटाटे आठवतात.
आमच्या आंगणात खोबरेल कैरीचे झाड होते, त्याच्या कै-या कमी आंबट असतात आणि हि कैरी खायला खुप चवदार असते. आसपासच्या ब-याच टवाळ मुलांचा त्या कै-यांवर डोळा असायचा. चोरुन ते आंगणात शिरत आणि आमच्या झाडावर चढुन त्या कै-या काढत. आम्ही देखिल त्या झाडावर चढुन कित्येकदा कै-या खाल्या आहेत, त्याचप्रमाणे चिंचा पण तोडल्या आहेत. हिरव्यागार गारुसलेल्या चिंचा, किंवा चिंचेमधे ति़खट-मीठ घालुन त्याची बनवलेली गोळी अजुन जीभेवर त्याची चव आहे. एकदा जेट एअरवेज मधे आम्हाला मस्त रॅपरमधे घातलेली चींचगोळी दिली तेव्हा अशीच मला लहानपणची आठवण झाली. संध्याकाळी ब-याच वेळा आम्ही मुली तेलपोहे करुन खायचो. खास मुलींचा आवडता प्रकार.

ह्या आणि अशा बालपणातील अनेक आठवणी आहेत. कधी वाटतं माझ्या मुलाला परदेशात राहिल्याने ह्या सर्व खेळांची, सणांची आमच्या सारखी मजा नाही लुटता येत. घरी इतके नातेवाईक येणे , मजा करणे त्याला बिचा-याला त्याची इतकी कल्पना नाही.

मला आमचा पहिला-वहिला T.V. देखिल आठवतो. Black & White होता. पण किती exciting आणि thrilling वाटलं होतं तो घरी आल्यावर. मग तो भला मोठ्ठा antenna गच्चीवरती लावायला लागायचा. तरी आम्हाला T.V. म्हणजे पाण्यातून बघावा असाच दिसायचा. अतिशय अस्पष्ट, त्यावर तारे चमकायचे. antenaa वर एखादा कावळा किंवा पक्षी बसला कि जे पाण्यातून दिसल्यासारखे चित्र दिसायचे तेही दिसेनासे व्हायचे. पण चिकाटी इतकी कि तरिही आम्ही T.V. बघायचो. नंतर मग दिल्लीतल्या एशियाड नंतर मग नाशिकला छान transmission येवु लागले. आम्हाला प्रत्येक गोष्टीचे अप्रुप होते. आत्ताची मुले त्यांना सगळे अगदी जन्मल्यापासुन मिळते.. त्यांना कशाचेच अप्रुप वाटत नाही. त्यात काय ह्या गोष्टी असतातच. ह्या जगात अगदी आदी कालापासुनच असल्या पाहिजेत असाच त्यांचा समज.
त्याकाळातील दूरदर्शनवरिल कार्यक्रम हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. किती साधे, गोंडस कार्यक्रम होते ते. १३ भागात serial संपायच्या. Lucy Show, Different Strokes ह्या इंग्रजी मालिका आणि हमलोग, खानदान, एक कहानी, कथा सागर, मालगुडी डेज, ये जो है जिंदगी, पेईंग गेस्ट, सारख्या छान मालिका चालायच्या. रविवारी सकाळी दिसणारा तो जुन्या हिंदी गाण्यावरील कार्यक्रम 'रंगोली'.

तंत्रज्ञानात जे मैलाचे दगड ठरले त्याचे आम्ही साक्षिदार होतो. त्यातलाच एक V.C.R. देखिल. स्वतःचा V.C.R. घेण्याआधी आम्ही भाड्याने V.C.R. आणायचो. मग तो १ दिवसाकरिता आणलेला असल्याने मग अगदी जितके पिक्चर बघता येतिल तितके आम्ही बघुन घेयचो. ज्या काकांकडे V.C.R. आणला आहे त्यांच्याकडे मग सगळे जमुन दिवसभर पिक्चर बघणे चालायचे. नंतर प्रत्येकाने VCR विकत घेतला. आता गंमत वाटते ते सर्व आठवुन. आता काय हजारो T.V. चॅनेल्स, हजारो मालिका, आणि हजारो movie चॅनेल्स , आणि त्यामुळे कशाचेच काहिच वाटत नाही. आपल्या मुलांनातरी का दोष द्या?
रेडिओ ने देखिल माझ्या बालपणात अगदी महत्त्वाची भुमिका बजावली. १० वी १२ वीचा अभ्यास असो वा engineering चे submission असो रेडिओ हा माझा अगदी जिवलग साथी होता. त्यावरिल बिनाका गितमाला आठवड्यातुन एकदाच असायची पण आम्ही ती आवर्जुन ऐकायचो. अमीन सयानीची ती टिपिकल बोलण्याची पद्धत आम्हाला त्याची मजा वाटायची. मग ''आपकी फर्माईश", 'बेला के फुल", "फौजी भाईयोंके लिये'' तबस्सुम, असे अनेक कार्यक्रम अजुनही आठवतात. माझी आजी ''आपली आवड'' हा रेडिओवरिल मराठी गाण्यांचा कार्यक्रम ऐकायची. ती इतक्या मोठ्याने रेडिओ लावायची (कारण तीला वयोपरित्वे कमी ऐकु येयचे) कि तिच्या घरातील रेडिओ मला आमच्या घरी स्पष्ट ऐकु येयचा आणि किति तरी मराठी गाणी मला "आपली आवड" मुळे आणि actually माझ्या आजीमुळे माहिती झाली.

Computer नावाची गोष्ट, माझा मुलगा अगदी १ वर्षाचा असल्यापासुन अगदी सराईतपणे वापरतो. १ वर्षाचा असतांना माझ्या मांडीवर बसुन तो paint brush उघडणे, त्यात त्याला जमतील असे चित्र विचित्र आकार काढणे, word मधे type करणे इत्यादी उद्योग अगदी सराईतपणे करायचा. त्याच्यासाठी ते एक फक्त खेळणे होते. पण विनोदाचा भाग म्हणजे हाच computer मी computer engineering ला admission घेईपर्यत बघितला देखिल नव्हता. आमच्या पहिल्या वहिल्या computer Lab च्या practical ला आम्हाला आमच्या professor ने मुलांनो 'हा keyboard बरका, आणि हा monitor, '' असे दाखविले होते. आताच्या मुलांना हसु येईल हे ऐकुन कदाचित. engineering च्या प्रथम वर्षाला असतांना 2 drive वाले computer होते. म्हणजे hard disk नव्हती P.C.'s ना. वरच्या drive वरती floppy टाकुन computer boot करायचा आणि खालच्या drive मधिल floppy मधे data save करायचा असा आमचा उद्योग चालायचा. मग 2nd year ला असतांना hard disk वाले computers आले. आणि अजुन एक गंमत म्हणजे मी engineer झाल्यानंतर windows operating system आली. आम्ही आपले DOS वरती काम करायचो.

अशा आणि अनेक बालपणीच्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर तरळुन गेल्या.
पण खरंतर प्रत्येक पिढीत असा बदल होणारच.. त्यालाच तर generation gap म्हणतो आपण. कदाचित माझ्या आई-वडिलांना आम्ही लहान असतांना हेच वाटले असेल कि किती फरक आहे ह्यांच्या आणि आपल्या खेळांमधे, मनोरंजनाच्या प्रकारामधे.. प्रत्येक पिढीत नविन नविन तंत्रज्ञान हे येणारच आणि बदल हे घडणारच. माझ्या मुलालादेखिल त्याच्या बालपणीच्या अशाच अमुल्य आठवणी रहातील. रहावोत.