Tuesday, June 02, 2015

वैचारिक गुलामगिरी

२०१४ निवडणुक पुर्व आणि निवडणुक उत्तरांत सोशल नेटवर्किंग साईट्स वरील लोकांच्या पोस्ट आणि कमेंट्स वाचुन एक लक्षात आलेली गोष्ट म्हणजे माणसाला जगण्यासाठी कुठल्या ना कुठल्यातरी विचारधारेची, श्रद्धास्थानाची गरज लागतेच.
भले तुम्ही नास्तिक असाल पण नास्तिकाला पण त्याच्या विचारप्रणालीचा गुरु (श्रद्धा स्थान) आणि त्याच्या विचारसरणीचा संप्रदाय हा लागतोच. सगळ्यांचीच एकदम rigid मते.

धर्म, जात, पोटजात, देश, संस्कृति, खंड, वंश, गोत्र, भाषा, पोटभाषा वगैरे वगैरे गोष्टी कमी का होत्या म्हणुन त्यात अजुन एका गोष्टीची भर पडली आहे आणि ती म्हणजे तुमचा राजकिय़ पक्ष.
स्वत:चा राजकीय पक्ष किंवा आणि त्याची बाजु घेउन हिरिरिने भांडणारी मंडळी सोशल नेटवर्किंग साईट्स वर सर्रास मिळतात.

तुम्ही सेक्यूलर असा, धर्मांध असा, कम्युनिस्ट असा, समाजवादी असा, मुलतत्ववादी असा मला सारे एकच भासतात.
कुठली तरी विचारधारा पकडुन (भले मग ती राजकीय अथवा सामजिक विचारधारा असु दे वा धार्मिक विचारधारा असु दे), आंधळेपणाने आपल्या विचारधारेची भक्ती करायची आणि आम्ही तुमच्या पेक्षा किती वेगळे आणि चांगले आहोत ह्यावरुन भांडायचे.
एखाद्या विचारधारेची गुलामगिरी पत्करायची आणि आपले विचार आणि मतं हे वज्रासारखे टणक बनवायचे, जरासुद्धा त्यात लवचिकता, दुस-याचे ऐकुन घेण्याची वृत्ती असले काही नाही. सगळं कसं फक्त black & white... चूक किंवा बरोबर. अरे? मी अशा लोकांना मतिमंद म्हणेन. पण बहुतांश लोकं हे असेच असतात.
आपल्याला नाही बुआ जमत असं... कुणाचं fan होणं सुद्धा जमत नाही... आपल्या स्वभावातचं नाही ते.

कुठलेच विचार आणि कुठलेच पंथ हे नेहमी प्रत्येक परिस्थितीत बरोबर असतातच असे नाही. आणि हे प्रत्येकाला समजले पाहीजे.
आणि विचार कुठलेही असले तरी त्याचे interpretation करणारा माणुस कसा आहे त्याची बौद्धिक कुवत काय आहे किंवा तो आपल्या सोयीनुसार, गरजेनुसार ते twist करुन वापरत तर नाही आहे ना हे देखिल महत्वाचे असते.

सोशल नेटवरकिंग साईट्स प्रचलीत होण्याआधी निवडणुकांचे एव्हडे स्तोम नव्हते. मतदानाच्या दिवशी फार तर फार कुटुंबातील व्यक्ती कुणाला मत देयचे वगैरे माफक एकमेकांशी बोलले तर बोलायचे. राजकारण असे घराघरात आले नव्हते.
मध्यमवर्ग तर राजकिय पक्ष आणि राजकारण ह्या दोन्ही बाबतित फारच उदासिन होता.
पण आता सोशल मिडिया मुळे राजकारण आणि राजकीय पक्ष हे घराघरात पोहोचले आहेत. तुम्ही कुठल्यातरी पक्षाचे असणे हे अगदी जरुरी झाले आहे.

सोशल नेटवर्किंग साईटसवर तुम्हाला कुठला ना कुठला tag असणं जरुरीचे आहे. आणि तुम्हाला इच्छा नसली, तुमची राजकीय मतं नसली तरी तुमच्या पोस्ट वरुन, कमेंट्स वरुन, तुमच्या जातीवरुन तुमचे classification कुठल्या ना कुठल्या पंथात हे लोकं करणारच.

अरे बाबांनो, मला कुठल्याच पक्षाचे, धर्माचे, विचारधारेचे समर्थन करायचे नाही आहे. मी कधी आस्तिक, कधी नास्तिक, कधी समाजवादी, कधी कम्युनीस्ट, कधी कट्टर हिंदुवादी कधी सेक्युलर, कधी राष्ट्र्प्रेमाने भारावलेली तर कधी हे विश्वचि माझे घर म्हणणारी आहे. मला केवळ आणि केवळ स्वत:च्या डोक्याने विचार करायचा आहे, कुठल्याही पंथाची, विचारधारेची गुलामगिरी नाही करायची आहे. पण असा choice च आता available नाही आहे. तुमचे वर्गीकरण केल्याशिवाय हि सोशल मिडीयावरची लोकं स्वस्थ बसणार नाहीत.
दुस-याचे विचार समजुन घेउन, त्याच्या विचारधारणेच्या चष्म्यातुन आपली विचारधारा पडताळुन पहाणे हे फारच बुद्धिमान आणि संयत माणसालाच जमु शकते बाकी सारे कुठल्या ना कुठल्या पंथात मेंढरासारखे फिरत असतात. वेळ जात नाही म्हणुन का, जगण्यासाठी अशा कुबड्यांची गरज असते म्हणुन हि मंडळी अशी अंधानुकरण करत असतात ते कळत नाही.

आणि आश्चर्य ह्याचे वाटते कि मोठे मोठे कलाकार, लेखक आणि दिग्गज मंडळी हि शेवटी कुठल्यातरी पंथातील गुलाम झालेलीच पाहीली मी. वाईट वाटते तेव्हा... पण हिच परिथिती आहे.
माणसाला जगण्यासाठी कुणीतरी गुरु, नेता, कुठलीतरी विचारधारा, कुठलातरी पंथ आणि त्याच्या कुबड्या ह्या लागतातच.
ह्या सर्व कुबड्या नाकारणा-यालाच मी खरे तर नास्तिक म्हणेन.