Thursday, February 25, 2010

प्रेमबन

कळीचे उमलणे, बहरणे
तिच्या हाती नव्हते
प्रेमबनातील तिचे आस्तित्वच तिच्या हाती नव्हते.

भ्रमराने यावे, प्रेम बरसुन जावे,
तिला उमलावे, तिने झंकारुन जावे
भ्रमराचे हे येणे , तिला उमलवणे
तिच्या हाती नव्हते,
प्रेमबनातील तिचे आस्तित्वच तिच्या हाती नव्हते.

भ्रमराने मग तिला सोडुन जावे
तिला दु:खात बुडवुन टाकावे
भ्रमराचे हे सोडुन जाणे, तिला कोमेजवणे
तिच्या हाती नव्हते.
प्रेमबनातील तिचे आस्तित्वच तिच्या हाती नव्हते.

पुन्हा नविन भ्रमराचे येणे, पुन्हा प्रेमात डुंबणे
पुन्हा खंगणे आणि पुन्हा कोमेजणे
सारे कसे क्रमाने, नियमाने घडत होते
जरी ते घडणे तिच्या हाती नव्हते
प्रेमबनातील तिचे आस्तित्वच तिच्या हाती नव्हते.

भ्रमराने एका फुलावरुन दुसर्‍या फुलावर जाणे
हा देखिल प्रेमबनाचाच नियम होता,
येणारा भ्रमर जाणार आहे
हे माहीत असुनही आकंठ त्याच्या प्रेमात स्वतःला झोकुन देणे
हेही तिच्या हाती नव्हते.
प्रेमबनातील तिचे आस्तित्वच तिच्या हाती नव्हते.

कधीतरी ह्या प्रेमबनानी नियम सोडुन वागावे
कधीतरी प्रेमबनात एकातरी भ्रमराने
फक्त तिच्याच जवळ रहावे
असे कळीला वाटे
पण तसे होणेही तिच्या हाती नव्हते
प्रेमबनाचे हे नियम असे आखणे, बदलणे तिच्या हाती नव्हते
प्रेमबनातील तिचे आस्तित्वच तिच्या हाती नव्हते.

मग कधीतरी एक पांथस्थ आला,
त्याने त्या फुलाला तोडले आणि देवाला अर्पण केले
प्राण सोडता सोडता फुलाला उमगले
कळीला पुन्हा पुन्हा बहरविणारा, फुलविणारा भ्रमर कुणीही असु देत,
पण त्या प्रेमभावना मात्र प्रत्येकवेळी सारख्याच होत्या
चिरंतन होत्या आणि तिच्याच होत्या
आता त्याचे निर्माल्य झाले होते
पण असे निर्माल्य होणे
हेही तिच्या हाती नव्हते
प्रेमबनातील तिचा अंत देखिल तिच्या हाती नव्हता.

Varsha