Wednesday, December 22, 2010

ती अंधार पोकळी

त्या अंधार पोकळीचे आणि माझे नाते तसे जुनेच. शाळेत असल्यापासुनच मला स्टेजवरील त्या अंधार पोकळीचे खुप आकर्षण होते.

लहानपणापासुनच मी फार एकलकोंडी. तासनतास एकटं रहाण्यात मला काहीच वाटायचं नाही, उलटं एकटं रहाणं आवडायचं. मित्र-मैत्रिणी देखिल अगदी मोजक्याच. मग माझी डायरी हिच माझी सखी होती. अगदी लिहीता – वाचता यायला लागलं त्या वयापासुन मी कविता, लेख व मनातील गुपितं माझ्या डायरीत लिहायला लागले. मनातलं कुठेतरी व्यक्त करायचं ठिकाण म्हणजे माझी डायरी, माझ्या कविता.

एरवी लोकांसमोर फारसं बोलता पण न येणारी मी शाळेतील नाटकांमधुन मात्र बिन्धास्त व उत्तम कामं करायची. एकांकीका स्पर्धा, कथाकथन, वक्तृत्व, नाच, गाणे ह्या सर्व शाळेतील activities मधे माझा नेहमी पहीला नंबर असायचा. स्टेजवर गेल्यावर आपल्याला एक वेगळीच शक्ती प्राप्त होते, लोकांनी टाळ्या वाजविल्यावर एक नशा, झिंग चढते ह्याची अनुभुती मला अगदी लहानवयातच आली.

काय असतं त्या स्टेजवर, रंगमंचावर असं? काय अशी अनामिक शक्ती असते ज्याची मला झिंग चढते? अजुनही आठवतो तो ’कैकयी चा पहीला प्रयोग, स्टॆजवर प्रवेश केला, पडदा उघडला आणि समोर तो काळोख. अंगावर रोमांचं उभे राहीले होते आणि त्या अंधाराशी माझं तत्काल नातं जोडलं गेलं होतं. एका प्रियकर आणि प्रेयसीचं जोडलं जातं तसं. मी माझे संवाद बोलु लागले, स्वत:ला पार विसरुन गेले होते, भुमिकेशी तल्लीन होऊन आणि त्या अंधार पोकळीशी मनसोक्त गप्पा मारत होते. जणुकाही तो अंधार म्हणजे माझा आत्मा माझा सखा होता आणि मनात दबुन राहीलेलं सारं काही मला त्याच्याबरोबर share करायंचं होतं. आता डायरीची जागा फक्त अंधाराने घेतली होती. एका संवेदनशील प्रसंगानंतर प्रेक्षकांनी दिलेल्या टाळ्या आणि मनसोक्त दाद म्हणजे खरंतर कलाकारासाठी ते एक tonic असतं. बस्सं फक्त त्या नशेसाठी, ती दाद पुन्हा मिळविण्यासाठी पुन्हा त्या रंगमंचावर जावसं वाटतं, नशा असते ती. It is an addiction.

एक उत्तम अभिनेता हा नेहमी रोजच्या जीवनात एक अतिशय लाजरा, introvert माणुस असतो. म्हणजे ब-याच वेळा अशा प्रतिक्रीया लोकांकडुन ऐकायला येतात, ’अरे बाप रे हा अभिनय करतो, शाळेत असतांना तर कधी तोंड उघडुन बोलायचा देखिल नाही. माझ्या बाबतीत देखिल ते खरं होतं. शाळेत, college मधे मी खुप शांत मुलगी होते. २ वाक्यांच्या पलीकडे मला संवाद देखिल साधता येयचा नाही पण तीच मी नाटकांमधुन मात्र वेगवेगळ्या भुमिका साकारु शकत होते. ज्या माझ्या स्वभावाच्या (म्हणजे लोकांना माहीत असलेल्या स्वभावाच्या) एकदम विरुद्ध होत्या. म्हणजे एकदम बिन्धास्त, extrovert, outgoing मुलीची भुमिका असो वा एखादे निगेटिव्ह पात्र (–ve character) असो, मी ते कन्व्हिन्सिंगली convincingly करु शकत होते.

मजा येते अशी भुमिका करतांना ज्यातिल पात्र हे आपल्या स्वभावाच्या एकदम विरुद्ध असतं. पण खरं सांगु हि सारी पात्र कुठे ना कुठे तरी आपल्यात, प्रत्येकात दडलेली असतात. आपण त्यांना आपल्यात कुठेतरी दडवुन ठेवलेलं असतं आणि रंगमंचावर गेल्यावर त्यांना त्या दडवुन ठेवलेल्या पात्रांना बाहेर मुक्त सोडायचे असते. बसं त्या रंगमंचावर पाउल ठेवलं कि मुक्त करायचं असतं स्वत:ला सा-या बंधनातुन, पाशातुन, बेगडी संस्कारातुन आणि प्रवेश करायचा असतो एका काल्पनिक दुनियेत. परकाया प्रवेश किंवा मी तर म्हणेन आपल्यात दडवुन ठेवलेल्या पात्राला आपल्यातुन मुक्त करायचं असतं आणि त्याला रंगमंचावर त्यातिल पात्रांमधे मुक्त संचार करु देयचा असतो.
असं वागलं तर लोकं काय म्हणतील, तसं केलं तर किती वाईट दिसेल अश्या योग्य- अयोग्यतेच्या सर्व बंधनातुन मुक्त असतं ते रंगमंचावरील वास्तव्य. बस स्वत:तुन मुक्त केलेल्या त्या पात्राला सोबत घेवुन एक वेगळीच दुनिया आयुष्य अनुभवायचं असतं. हो पण त्या मुक्त संचार करणा-या आपल्यातील पात्राला दिशा दाखविण्याचे आणि वेळप्रसंगी त्याला काबुत ठेवण्याचे काम देखिल आपल्यातील मुळ आपल्याला करावे लागते. कधीकधी खुप भावना अनावर होवुन आपण भुमिकेत खुप जास्त तल्लीन होण्याची शक्यता असते पण तेव्हा स्वत:वर थोडा ताबा ठेवावा लागतो.

कधी कधी वाटतं, मुखवटा कुठला असतो, रोज जगात वावरतांना घालतो तो का रंगमंचावर चढवतो तो? रंगमंचावर आपण मुखवटा चढवितो का काढतो?

कलेचा कुठलाही प्रकार मग ते नृत्य असो वा संगित असो वा नाटक, चित्रकला असो, कविता असो कलाकारासाठी आणि त्या कलेचा आस्वाद घेणा-या प्रेक्षकासाटी कला हि एक catharsis करणारी घटना असते.
आपल्यातील दु:ख, आनंद, प्रेमभावना किंवा इतर तीव्र स्वरुपातील भावना ज्या कलाकाराला अंतर्मुख होण्यास भाग पाडतात त्या तो कलेच्या माध्यमातुन उतरवितो.
ब-य़ाचवेळा ह्या भावना वैश्विक असतात, त्या भावनाकल्लोळामधुन, दु:खामधुन प्रत्येक माणुस कधी ना कधी गेलेला असतो. कलाकार फक्त आपली संवेदना आणि अनुभव कलेच्या माध्यमातुन प्रकट करु शकतो. अशाप्रकारे व्यक्त होणारे प्रकटीकरण जेव्हा प्रेक्षक, वाचक आपल्या स्वत:च्या संवेदना, अनुभवांशी रिलेट करु शकतात त्याचवेळी ते प्रकटीकरण त्याला देखिल तितकेच आंनद देवुन जाते.

बसं आज हे सर्व असेच लिहावेसे वाटले. आज २-३ वर्षांत मी नाटकांत काम केलेले नाही आहे आणि प्रत्येकवेळी जेव्हा मी एखादा कार्यक्रम बघायला जाते तेव्हा तेव्हा तो रंगमंच मला आपल्याकडॆ खुणावतो. मी देखिल व्याकुळते, एखादी प्रेयसी प्रियकराला भेटण्यासाठी जेव्हडी व्याकुळेल तेव्हडीच.

5 comments:

हेरंब said...

मस्त लिहिलंय.. आवडलं !!

सुषमेय said...

khup sundar lihilay

Varsha said...

धन्यवाद हेरंब, सुषमेय

Sandip Jadhav said...

Khupach chhan!!

Prabhanjan Patwardhan said...

फारच छान...तू तुझ्या मनातले विचार छान प्रकारे मांडू शकतेस....खूप कमी लोकांना हे जमते....!