Wednesday, December 22, 2010

ती अंधार पोकळी

त्या अंधार पोकळीचे आणि माझे नाते तसे जुनेच. शाळेत असल्यापासुनच मला स्टेजवरील त्या अंधार पोकळीचे खुप आकर्षण होते.

लहानपणापासुनच मी फार एकलकोंडी. तासनतास एकटं रहाण्यात मला काहीच वाटायचं नाही, उलटं एकटं रहाणं आवडायचं. मित्र-मैत्रिणी देखिल अगदी मोजक्याच. मग माझी डायरी हिच माझी सखी होती. अगदी लिहीता – वाचता यायला लागलं त्या वयापासुन मी कविता, लेख व मनातील गुपितं माझ्या डायरीत लिहायला लागले. मनातलं कुठेतरी व्यक्त करायचं ठिकाण म्हणजे माझी डायरी, माझ्या कविता.

एरवी लोकांसमोर फारसं बोलता पण न येणारी मी शाळेतील नाटकांमधुन मात्र बिन्धास्त व उत्तम कामं करायची. एकांकीका स्पर्धा, कथाकथन, वक्तृत्व, नाच, गाणे ह्या सर्व शाळेतील activities मधे माझा नेहमी पहीला नंबर असायचा. स्टेजवर गेल्यावर आपल्याला एक वेगळीच शक्ती प्राप्त होते, लोकांनी टाळ्या वाजविल्यावर एक नशा, झिंग चढते ह्याची अनुभुती मला अगदी लहानवयातच आली.

काय असतं त्या स्टेजवर, रंगमंचावर असं? काय अशी अनामिक शक्ती असते ज्याची मला झिंग चढते? अजुनही आठवतो तो ’कैकयी चा पहीला प्रयोग, स्टॆजवर प्रवेश केला, पडदा उघडला आणि समोर तो काळोख. अंगावर रोमांचं उभे राहीले होते आणि त्या अंधाराशी माझं तत्काल नातं जोडलं गेलं होतं. एका प्रियकर आणि प्रेयसीचं जोडलं जातं तसं. मी माझे संवाद बोलु लागले, स्वत:ला पार विसरुन गेले होते, भुमिकेशी तल्लीन होऊन आणि त्या अंधार पोकळीशी मनसोक्त गप्पा मारत होते. जणुकाही तो अंधार म्हणजे माझा आत्मा माझा सखा होता आणि मनात दबुन राहीलेलं सारं काही मला त्याच्याबरोबर share करायंचं होतं. आता डायरीची जागा फक्त अंधाराने घेतली होती. एका संवेदनशील प्रसंगानंतर प्रेक्षकांनी दिलेल्या टाळ्या आणि मनसोक्त दाद म्हणजे खरंतर कलाकारासाठी ते एक tonic असतं. बस्सं फक्त त्या नशेसाठी, ती दाद पुन्हा मिळविण्यासाठी पुन्हा त्या रंगमंचावर जावसं वाटतं, नशा असते ती. It is an addiction.

एक उत्तम अभिनेता हा नेहमी रोजच्या जीवनात एक अतिशय लाजरा, introvert माणुस असतो. म्हणजे ब-याच वेळा अशा प्रतिक्रीया लोकांकडुन ऐकायला येतात, ’अरे बाप रे हा अभिनय करतो, शाळेत असतांना तर कधी तोंड उघडुन बोलायचा देखिल नाही. माझ्या बाबतीत देखिल ते खरं होतं. शाळेत, college मधे मी खुप शांत मुलगी होते. २ वाक्यांच्या पलीकडे मला संवाद देखिल साधता येयचा नाही पण तीच मी नाटकांमधुन मात्र वेगवेगळ्या भुमिका साकारु शकत होते. ज्या माझ्या स्वभावाच्या (म्हणजे लोकांना माहीत असलेल्या स्वभावाच्या) एकदम विरुद्ध होत्या. म्हणजे एकदम बिन्धास्त, extrovert, outgoing मुलीची भुमिका असो वा एखादे निगेटिव्ह पात्र (–ve character) असो, मी ते कन्व्हिन्सिंगली convincingly करु शकत होते.

मजा येते अशी भुमिका करतांना ज्यातिल पात्र हे आपल्या स्वभावाच्या एकदम विरुद्ध असतं. पण खरं सांगु हि सारी पात्र कुठे ना कुठे तरी आपल्यात, प्रत्येकात दडलेली असतात. आपण त्यांना आपल्यात कुठेतरी दडवुन ठेवलेलं असतं आणि रंगमंचावर गेल्यावर त्यांना त्या दडवुन ठेवलेल्या पात्रांना बाहेर मुक्त सोडायचे असते. बसं त्या रंगमंचावर पाउल ठेवलं कि मुक्त करायचं असतं स्वत:ला सा-या बंधनातुन, पाशातुन, बेगडी संस्कारातुन आणि प्रवेश करायचा असतो एका काल्पनिक दुनियेत. परकाया प्रवेश किंवा मी तर म्हणेन आपल्यात दडवुन ठेवलेल्या पात्राला आपल्यातुन मुक्त करायचं असतं आणि त्याला रंगमंचावर त्यातिल पात्रांमधे मुक्त संचार करु देयचा असतो.
असं वागलं तर लोकं काय म्हणतील, तसं केलं तर किती वाईट दिसेल अश्या योग्य- अयोग्यतेच्या सर्व बंधनातुन मुक्त असतं ते रंगमंचावरील वास्तव्य. बस स्वत:तुन मुक्त केलेल्या त्या पात्राला सोबत घेवुन एक वेगळीच दुनिया आयुष्य अनुभवायचं असतं. हो पण त्या मुक्त संचार करणा-या आपल्यातील पात्राला दिशा दाखविण्याचे आणि वेळप्रसंगी त्याला काबुत ठेवण्याचे काम देखिल आपल्यातील मुळ आपल्याला करावे लागते. कधीकधी खुप भावना अनावर होवुन आपण भुमिकेत खुप जास्त तल्लीन होण्याची शक्यता असते पण तेव्हा स्वत:वर थोडा ताबा ठेवावा लागतो.

कधी कधी वाटतं, मुखवटा कुठला असतो, रोज जगात वावरतांना घालतो तो का रंगमंचावर चढवतो तो? रंगमंचावर आपण मुखवटा चढवितो का काढतो?

कलेचा कुठलाही प्रकार मग ते नृत्य असो वा संगित असो वा नाटक, चित्रकला असो, कविता असो कलाकारासाठी आणि त्या कलेचा आस्वाद घेणा-या प्रेक्षकासाटी कला हि एक catharsis करणारी घटना असते.
आपल्यातील दु:ख, आनंद, प्रेमभावना किंवा इतर तीव्र स्वरुपातील भावना ज्या कलाकाराला अंतर्मुख होण्यास भाग पाडतात त्या तो कलेच्या माध्यमातुन उतरवितो.
ब-य़ाचवेळा ह्या भावना वैश्विक असतात, त्या भावनाकल्लोळामधुन, दु:खामधुन प्रत्येक माणुस कधी ना कधी गेलेला असतो. कलाकार फक्त आपली संवेदना आणि अनुभव कलेच्या माध्यमातुन प्रकट करु शकतो. अशाप्रकारे व्यक्त होणारे प्रकटीकरण जेव्हा प्रेक्षक, वाचक आपल्या स्वत:च्या संवेदना, अनुभवांशी रिलेट करु शकतात त्याचवेळी ते प्रकटीकरण त्याला देखिल तितकेच आंनद देवुन जाते.

बसं आज हे सर्व असेच लिहावेसे वाटले. आज २-३ वर्षांत मी नाटकांत काम केलेले नाही आहे आणि प्रत्येकवेळी जेव्हा मी एखादा कार्यक्रम बघायला जाते तेव्हा तेव्हा तो रंगमंच मला आपल्याकडॆ खुणावतो. मी देखिल व्याकुळते, एखादी प्रेयसी प्रियकराला भेटण्यासाठी जेव्हडी व्याकुळेल तेव्हडीच.

Saturday, November 27, 2010

सपने

सपने भी आजकल वास्तव जैसे आते है,
सपनॊंने भी अगर सपनापन छोडा,
तो आदमी जाए तो जाए कहा?

वास्तव का एक है वोह कभी अपनी पहचान खोता नही,
भुलेसेभी वोह कभी सपनोंकी तरहा अच्छा होता नही,
पर आजकल सपनेभी अपनी अच्छाई छोडने लगे है,
दो पल के सुकुन की अब वोह भी किंमत मांगने लगे है !

(Varsha - 27th Nov 10)

Thursday, September 23, 2010

चारोळ्या (’तू’)

तुझ्यासमोर गळुन पडलेले शब्द
कवितेत मात्र चुरुचुरु बोलु लागतात
तुझ्यासमोर लपणा-या भावना
कवितेत मात्र ओसंडुन वाहु लागतात

तू दुरुन दिसतांच
मी शब्दांची जुळवाजुळव करायला लागते.
पण तू जवळ येतांच
शब्दांना निपचित पडलेलं बघते.

तू येतोस
आणि माझे चराचर पुलकित होते
तू जातोस
आणि ते उजाड माळरान होते

तुझ्या प्रेमामधे खंगणं
हे आता माझे व्यसन झाले आहे
खरंतर हि आता
स्वत:ला हवीहवीशी वाटणारीच गोष्ट झाली आहे

Varsha

Tuesday, May 04, 2010

आभास

तुझं माझं नातच आभासांचं
कधी खूप खूप खोल वाटणारं,
थेट जाउन हृदयाला भिडणारं,
काळजाला हात घालणारं,
पण कधी क्षणात उथळ होणारं,
अनोळखी वाटणारं !

मग खरं काय असतं ?
ते खूप खोलवर घाव घालणारं,
हृदयाला साद घालणारं ?
का पाण्याची वाफ व्हावी
त्याप्रमाणे क्षणात उडून जाणारं ?
शेवटी आभासच सारे !
त्यात खरं काय आणि खोटं काय !

तुझं माझं नातच आभासांचं
शब्दांशिवायच भावना बोलणारं,
मुकेपणानेच एकमेकांना साद घालणारं,
हुरहुर लावणारं, धुंदी आणणारं,

पण कधी कधी हे मुकेपणसुद्धा बोलेनासं होतं
निशब्दता पण अनोळखी होते.
मग खरं काय असतं ?
ते मुकेपणातून प्रेम बरसणं ?
की ती अनोळखी निशब्दता ?
शेवटी आभासच सारे !
त्यात खरं काय आणि खोटं काय !

Varsha

Thursday, February 25, 2010

प्रेमबन

कळीचे उमलणे, बहरणे
तिच्या हाती नव्हते
प्रेमबनातील तिचे आस्तित्वच तिच्या हाती नव्हते.

भ्रमराने यावे, प्रेम बरसुन जावे,
तिला उमलावे, तिने झंकारुन जावे
भ्रमराचे हे येणे , तिला उमलवणे
तिच्या हाती नव्हते,
प्रेमबनातील तिचे आस्तित्वच तिच्या हाती नव्हते.

भ्रमराने मग तिला सोडुन जावे
तिला दु:खात बुडवुन टाकावे
भ्रमराचे हे सोडुन जाणे, तिला कोमेजवणे
तिच्या हाती नव्हते.
प्रेमबनातील तिचे आस्तित्वच तिच्या हाती नव्हते.

पुन्हा नविन भ्रमराचे येणे, पुन्हा प्रेमात डुंबणे
पुन्हा खंगणे आणि पुन्हा कोमेजणे
सारे कसे क्रमाने, नियमाने घडत होते
जरी ते घडणे तिच्या हाती नव्हते
प्रेमबनातील तिचे आस्तित्वच तिच्या हाती नव्हते.

भ्रमराने एका फुलावरुन दुसर्‍या फुलावर जाणे
हा देखिल प्रेमबनाचाच नियम होता,
येणारा भ्रमर जाणार आहे
हे माहीत असुनही आकंठ त्याच्या प्रेमात स्वतःला झोकुन देणे
हेही तिच्या हाती नव्हते.
प्रेमबनातील तिचे आस्तित्वच तिच्या हाती नव्हते.

कधीतरी ह्या प्रेमबनानी नियम सोडुन वागावे
कधीतरी प्रेमबनात एकातरी भ्रमराने
फक्त तिच्याच जवळ रहावे
असे कळीला वाटे
पण तसे होणेही तिच्या हाती नव्हते
प्रेमबनाचे हे नियम असे आखणे, बदलणे तिच्या हाती नव्हते
प्रेमबनातील तिचे आस्तित्वच तिच्या हाती नव्हते.

मग कधीतरी एक पांथस्थ आला,
त्याने त्या फुलाला तोडले आणि देवाला अर्पण केले
प्राण सोडता सोडता फुलाला उमगले
कळीला पुन्हा पुन्हा बहरविणारा, फुलविणारा भ्रमर कुणीही असु देत,
पण त्या प्रेमभावना मात्र प्रत्येकवेळी सारख्याच होत्या
चिरंतन होत्या आणि तिच्याच होत्या
आता त्याचे निर्माल्य झाले होते
पण असे निर्माल्य होणे
हेही तिच्या हाती नव्हते
प्रेमबनातील तिचा अंत देखिल तिच्या हाती नव्हता.

Varsha