Tuesday, November 18, 2008

दु:ख

तू मिळाला नाहीस असं कुणाचच आयुष्य नाही
प्रत्येकाला तूला सामोरं जावंच लागतं.
तू तर एकच आहेस
तू प्रत्येकाच्या घरात, हृदयात रहातोस
पण प्रत्येकाच्या वेगळ्या रसायनात मिसळून
विभिन्न रुपे धारण करतोस.
तू प्रत्येकाच्याच रसायनात मिसळला आहेस.
काहिंना तू आपल्या रसायनात मिसळून गेल्यावर
ह्या रसायनाचीच नशा चढते, व कलेची निर्मिती होते.

प्रत्येकजण तुझं त्यांच्यातील आस्तित्व दाखविणं टाळतात.
पण तूच तर आहेस जो सच्चे मीत्र, सच्चा सखा मिळवून देतोस.
एखाद्या फसव्या अनाहुत क्षणी
जेव्हा दोन व्यक्तींना परस्परांतील तूझे दर्शन होते
तेव्हा त्या अधिक जवळ येतात.

तूझ्याशी दोस्ती करायची का वैर हे प्रत्येकाच्या रसायनावर अवलंबून असतं
पण चांगल्या माणसाच्या रसायनात
तू बहुधा दुध पाण्याच्या मिश्रणासारखा सहज मिसळतोस
आणि म्हणूनच तू चांगल्या माणसात अधिक आढळतोस.

तू आहेस म्हणूनच सुखाचे आनंदाचे महत्त्व
तू नसताच तर मग सुखाला सुख तरी कोणी म्हणाले असते का?
सुखाचे आणि हास्याचे नाते आहे
तूझे आणि अश्रूंचे नाते आहे
पण सुख आणि हास्य दोन्हिही फसवं व कृत्रिम असु शकतं
दु:ख आणि अश्रु मात्र सच्चे असतात.

तूच माणसाला जमिनीवर ठेवतोस,
आर्तता, उदासी ही पण तूझीच रुपे आहेत
प्रेमाला पण सुखापेक्षा तूच जवळचा वाटतोस
आणि मला देखिल.....

तुझ्या मुळेच मला माझ्या मनाच्या खोल डोहाचा तळ गाठता येतो
व माझ्या आत्म्याचे देखिल दर्शन होते.

सोनेरी बंदिस्त क्षण

तुझ्या बरोबरचे सोनेरी क्षण मी मनाच्या एका कोप-यात बंदिस्त करुन ठेवले आहेत.
येशिल कधी तू त्या क्षणांना पून्हा जिवंत करायला?
पण अगदी तसाच असशील तू त्या क्षणांमध्ये बंदिस्त केलेल्या तूझ्यासारखा?
का आता बदलला आहेस तू?
चल तू पून्हा भेटलास तर आपण एक खेळ खेळू
ह्या खेळात मला पण माझीच भूमिका करायची आहे
आणि तूला पण तूझीच भूमिका करायची आहे,
फरक इतकाच आहे की आपल्याला त्या क्षणांमधल्या बंदिस्त झालेल्या आपली भूमिका करायची आहे.
बोल आहे मंजूर?
हा खेळ माझ्यासाठी खूप खतरनाक बनू शकतो.
कारण तूला जर ती भूमिका तशीच नाही वठविता आली
तर ते सोनेरी बंदिस्त क्षण उडून जातिल,
पाण्याची वाफ व्हावी त्याप्रमाणे ते नष्ट होतिल
आणि तसं झालं तर मी टाहो फोडेल, मीच संपून जाईन.
पण नको, नकोच तो खेळ
कारण आपण दोघांनाही कदाचित तो खेळ नाही खेळता येणार
कारण वयानुरुप मी बदललेली आहे
आणि तू देखिल बदलला असशिल
ह्या अघोरी खेळात माझे क्षण कायमचे उडून जातिल
जी माझ्या आयुष्यातील सुखाची पुंजी आहे.

Saturday, November 01, 2008

तू

तूझे आणि माझे एक अगम्य नाते होते,
तू जवळ होतास, तेव्हा वाटे खूप परका आहेस तू
"तू खरच फक्त माझा आहेस?"
पण तू सोडून गेलास तेव्हा कळाले की तू माझा आहेस की नाही माहित नाही,
पण मी फक्त तूझीच आहे.
काळ सरला की आठवणी पुसट होतात म्हणे,
खोटं आहे ते, काळासरशी तूझ्या आठवणी अधिक गडद होत गेल्या
मन तूझ्या आठवणींच्या जेरबंद कोठडीत अजूनही बंदिस्त आहे
हि शीक्षा ते स्वतःहूनच भोगत आहे.
तूझ्या आठवणी ह्या फक्त आठवणी न राहता
मला दुखा:त फुंकर घालणारा, सुख देणारा अव्याहत स्त्रोत आहेत.
तू दिलेल्या दु:खांच्या देखिल मी सुंदर बागा फुलविल्या आहेत,
त्या बागांची माळीण देखिल मीच आहे.
त्या बागांमधे मी कधीपण मनाला फिरायला घेवून जाते
आणि निरस आयुष्यात त्या सुंदर बागांचा सुगंध आणि गारवा आणते.